नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मार्च 2024 पासून ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते आणि सोमवारी त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. मंगळवारी राजीव कुमार निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्ञानेश कुमार यांच्याकडे निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुखबीर सिंग संधू हे निवडणूक आयुक्त आहेत, तर विवेक जोशी यांची सोमवारी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मतदान हे राष्ट्र उभारणीच्या दिशेने पहिले पाऊल आहे. म्हणून १८ वर्षे पूर्ण केलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदार बनले पाहिजे आणि नेहमीच मतदान केले पाहिजे. भारतीय संविधान, त्याअंतर्गत सादर केलेले निवडणूक कायदे, नियम आणि कायदे यांच्यानुसार, भारतीय निवडणूक आयोग मतदारांसोबत होता, आहे आणि नेहमीच राहील.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
ज्ञानेश कुमार यांची सोमवारी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यांतर्गत नियुक्त होणारे ज्ञानेश कुमार हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल. कायद्यानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होतात किंवा सहा वर्षे आयोगात राहू शकतात.
ज्ञानेश कुमार हे 1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 31 जानेवारी 2024 रोजी निवृत्त झाले आहेत. ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी सहकार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. तसेच ज्ञानेश कुमार यांनी गृह मंत्रालयात असताना राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे. व जेव्हा कलम 370 रद्द करण्यात आले, तेव्हा ते गृह मंत्रालयात जम्मू आणि काश्मीर डेस्कचे प्रभारी होते.