छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. महाराजांची आज 395वी जयंती आहे. शिवनेरी किल्ल्यासह राज्यातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री, डॉ. मनसुख मांडविया आज 20 हजार माय भारत स्वयंसेवकांसह जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढणार आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर राज्यमंत्री, खासदार आणि आमदार/महापालिका सदस्य देखील या पदयात्रेत सामील होणार आहेत.
आजच्या या खास दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि चिरस्थायी वारशाचा गौरव केला जाणार आहे. निसर्गरम्य वातावरणातून 4 किलोमीटर अंतरांची वाटचाल करणाऱ्या या पदयात्रेचा आरंभ पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातून होणार असून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत ही पदयात्रा काढली जाणार आहे. युवावर्ग, स्थानिक नेते आणि नागरिकांना एकत्र आणत, प्रथमच, संपूर्ण राज्यात सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी अशाच प्रकारच्या पदयात्रा काढण्यात येणार आहे.
संविधानाच्या 75 वर्षपूर्तीच्या सन्मानार्थ आणि भारताची चैतन्यमय सांस्कृतिक विविधता साजरी करण्यासाठी नियोजित 24 पदयात्रांच्या मालिकेतील पुण्यातील जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा, ही सहावी पदयात्रा आहे. देशभरात अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जाणार असून त्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवणे आणि भारताच्या समृद्ध वारशाशी अनुबंध जोडणे हा त्यामागील उद्देश आहे. भारत भरातील तरुणांनी माय भारत पोर्टलवर (www.mybharat.gov.in) नोंदणी करून या पदयात्रेत सहभागी व्हावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तसेच अखंड आणि आत्मनिर्भर भारताबद्दलची त्यांची दूरदृष्टी, यांचा सन्मान करावा, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.