काही दिवसांपूर्वीच दिल्ली विधानसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. पण मात्र मधल्या काळात अनेक दिवस उलटले तरी मुख्यमंत्री कोण होईल ? याबाबत सस्पेन्स कायम होता. पण आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आणि लवकरच दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल हा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे. कारण नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय धुरळा शांत होऊन तब्बल २७ वर्षांनंतर भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहे.
दरम्यान, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा २० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता दिल्लीतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या रामलीला मैदानावर होणार आहे. हा शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी आता जोरदार तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल ३० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील आणि मोठ्या संख्येनं दिल्लीकर जनता या सोहळ्यात सहभागी होईल असं बोललं जातंय.
त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिकाही समोर आली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनाही आमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली आहे. याशिवाय, एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, ते उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर, शपथविधी सोहळ्यासाठी राजकारणी आणि चित्रपट कलाकारांव्यतिरिक्त, खास लोकांना आमंत्रण पत्रिका पाठवल्या जात आहेत.
दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव जास्त चर्चेत आहे. याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.