तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने रमजानच्या काळात मुस्लिम कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा सरकारने घेतलेल्या या निर्णयाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. नवरात्रीच्या उपवासादरम्यान हिंदूंना अशी कोणतीही सूट दिली जात नाही, असा सवाल यावेळी भाजप कडून उपस्थित केला जात आहे.
रमजानचा पवित्र महिना 1 किंवा 2 मार्चपासून सुरू होऊ शकतो. यादरम्यान तेलंगणाच्या मुख्य सचिवांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश सादर केला आहे. या आदेशानुसार रमजान महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास आधी कार्यालयातून बाहेर पडण्याची परवानगी असेल. हा आदेश मुस्लिम शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, आउटसोर्सिंग, मंडळ आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्यांसह नियमित सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असेल. आपत्कालीन किंवा विशेष गरज भासल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयात राहावे लागेल. या आदेशानंतर मुस्लिम कर्मचारी इफ्तारपूर्वी संध्याकाळी चार वाजण्यापूर्वी शाळा किंवा कार्यालयातून बाहेर पडू शकतील. राज्य सरकारचा हा आदेश 31 मार्चपर्यंत लागू राहील.
https://twitter.com/amitmalviya/status/1891739659044069612
दरम्यान, मुस्लिम कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्याच्या आदेशावर भाजपने टीका केली आहे. भाजपा आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘तेलंगणातील काँग्रेस सरकारमध्ये तुष्टीकरणाचा विषाणू पसरला आहे. ज्याने रमजानच्या काळात मुस्लिम राज्य कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, नवरात्रीच्या उपवासादरम्यान हिंदूंना अशी कोणतीही सूट दिली जात नाही. हा निर्णय मुस्लिमांच्या कल्याणासाठी नसून मतपेढी निर्माण करण्यासाठी असल्याचे अमित मालवीय यांनी म्हटले आहे.