दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २७ वर्षांनी मिळवलेल्या लक्षणीय विजयानंतर भारतीय जनता पक्षाने अखेर बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले आहे. भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. हा शपथविधी सोहळा दुपारी १२ वाजता पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांचे 4 मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येऊ शकणार नाहीत. गुजरात आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्रीही या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीही राज्य दिन असल्यामुळे येऊ शकणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, थावर चंद गेहलोत, जुएल ओराम, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि बिहारचे मंत्री शाहनवाझ हुसेन या नेत्यांच्या उपस्थितीत रेखा गुप्ता या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
दरम्यान, याआधी सुरु असलेल्या चर्चेनुसार आज शपथविधी वेळी प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं सांगण्यात येत आहे. मात्र, भाकपकडून याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही. बुधवारच्या बैठकीत फक्त मुख्यमंत्र्यांच्या च नावाची घोषणा करण्यात आली आहे.
रेखा गुप्ता यांच्या राजकीय प्रवासाची सुरवात
रेखा गुप्ता यांनी १९९२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोबत आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्या दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या माजी अध्यक्ष आहेत. याशिवाय त्यांनी भाजप महिला मोर्चाचे सरचिटणीस आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. गेल्या अनेक काळापासून राजकरणात सक्रिय असलेल्या रेखा गुप्ता आज दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.