राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा मेल मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ई-मेलद्वारे शिंदे यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील जवळ-जवळ 7 ते 8 पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा मेल आला आहे.
पोलिसांना धमकीचा मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या ईमेलमध्ये एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याची स्पष्ट धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाल्या आहेत. अशा प्रकरणाचा ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत झाले असून, लवकरच यामागे कोणाचा हात आहे हे समोर येईल. की फक्त दिशाभूल करण्यासाठी अशाप्रकारचा मेल पाठवण्यात आला आहे हे देखील समोर येईल.
उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने असा धमकीचा मेल पोलीस ठाण्यात येणे हा गंभीर मुद्दा असून, याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेसह विविध तपास यंत्रणा कामाला लागल्या असून, लवकरच धमकी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात येईल व योग्य ती कारवाई केली जाईल.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महारष्ट्रात नसून, दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील हजेरी लावली. शिंदेंसोबत आज दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत.