अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनातील सर्व वरिष्ठ वकिलांना बडतर्फ केले आहे. यासंबंधित डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘गेल्या चार वर्षांपासून न्याय व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप वाढला होता, आणि म्हणून मी बायडेन प्रशासनातील सर्व अमेरिकी वकिलांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.’
‘आपल्याला घर स्वच्छ करायचे आहे आणि लोकांचा विश्वास पुन्हा मिळवायचा आहे. अमेरिकेचे चांगले दिवस तेव्हाच येऊ शकतात जेव्हा न्यायव्यवस्था योग्य काम करेल.’ असं ट्रम्प यांनी आपल्या सोशलमीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अमेरिकेच्या न्याय विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक अधिकाऱ्यांनी ट्रम्प पदभार स्वीकारण्यापूर्वीच राजीनामे दिले आहेत. तर अनेक वकिलांनी नुकतीच त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेत राष्ट्राध्यक्ष बदल्यानंतर वकिलांनी राजीनामा देण्याची प्रथा आहे. सहसा नवीन प्रशासन वकिलांचा राजीनामा मागते. परंतु बडतर्फ करू शकत नाही. मात्र, यावेळी ट्रम्प यांनी ही प्रथा बदलली आहे आणि वकिलांना काढून टाकले आहे.
पदभार स्वीकारण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्याय विभागावर वारंवार टीका केली आहे. ट्रम्प यांनी याआधी न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनच्या वकिलांना कामावरून काढून टाकले आहे.
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारादरम्यान आरोप केला होता की, ‘न्याय विभागाचा त्यांच्याविरुद्ध चुकीचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बायडेन प्रशासनात ट्रम्प यांच्याविरोधात अनेक खटले चालवण्यात आले होते. दरम्यान, ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याविरोधातील खटल्यात सहभागी असलेल्या वकिलांना यापूर्वीच न्याय विभागातून काढून टाकले आहे.