ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालवल्या जाणाऱ्या अश्लील सामग्रीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. केंद्र सरकराने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना देशाच्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.
सोशल मीडियावर अश्लील विनोदांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ओटीटी प्लॅटफॉर्मला कायद्याचे पालन करण्यास सांगितले आहे. व वादग्रस्त सामग्री प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी आणि स्वयं-नियामक संस्थांना कोणतीही सामग्री प्रकाशित करताना माहिती तंत्रज्ञान नियम-2021 अंतर्गत निर्धारित आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना जारी करण्यात आली आहे. यात सामग्रीच्या वय-आधारित वर्गीकरणाचे विशिष्ट पालन देखील करण्यास सांगितले आहे.
मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मला व स्वयं-नियामक संस्थांना आचारसंहितेच्या उल्लंघनावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अलीकडेच इंडियाज गॉट लेटेंट नावाच्या कार्यक्रमात यूट्यूबर रणवीर अलाहबादीयाच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सामग्री नियमन सुचवल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.
गृह मंत्रालयाने सांगितले आहे की, ‘त्यांना काही ओटीटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील सामग्री प्रसारित केल्याबद्दल खासदार आणि वैधानिक संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच, जनतेच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. हे लक्षात घेता, ओटीटी पालफॉर्म्सना आचारसंहितेचे पालन करावे असा सल्ला दिला जातो आहे.