अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी असलेल्या काश पटेल यांचा ५१-४९ मतांनी विजय झाला. काश पटेल यांच्या उमेदवारीला गुरुवारी सिनेटने मंजुरी दिली आहे.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या नवव्या संचालकपदी निवड होताच काश पटेल ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. यावेळी ते म्हणाले, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अॅटर्नी जनरल बोंडी यांचा अतूट विश्वास आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो. 9/11 नंतर आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी “जी-मेन” पासून एफबीआयकडे एक ऐतिहासिक वारसा आहे. अमेरिकन लोकांना पारदर्शक, जबाबदार आणि न्यायासाठी वचनबद्ध एफबीआयची आवश्यकता आहे. आपल्या न्यायव्यवस्थेत गेल्या सरकारच्या काळात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने जनतेचा विश्वास कमी झाला आहे. पण इथून पुढे तस होणार नाही.
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही अमेरिकन लोकांना अभिमान वाटेल असा एफबीआय पुन्हा निर्माण करू. जे अमेरिकन लोकांना हानी पोहोचवू पाहत आहेत त्यांना हा इशारा समजावा. या जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठेअसाल तिथून तुम्हाला शोधून काढू आणि शिक्षा देऊ. अशा इशारा त्यांनी अमेरिकेवर वाईट नजर टाकणाऱ्यांना दिला आहे.
कोण आहेत काश पटेल?
कश्यप प्रमोद विनोद पटेल असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म न्यूयॉर्कमधील गार्डन सिटी येथे झाला
आहे. त्यांचे पालक भारतातून स्थलांतरित झाले होते. पटेल यांनी यापूर्वी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकन सरकारमध्ये काम पहिले आहे. त्यांनी हाऊस इंटेलिजन्स कमिटीमध्ये वरिष्ठ सहायक म्हणून काम केले आहे, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर आणि कार्यवाहक संरक्षण सचिवांचे प्रमुख सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली. तसंच काश पटेल हे ट्रम्प यांच्या जवळचे व्यक्ती मानले जातात.