‘‘मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो, तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके,’ म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझे प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत.
विज्ञान भवन येथे झालेल्या या समारंभात मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, संमेलन संयोजन आणि सरहद संस्थेचे प्रमुख नहार अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीलाच, ‘‘मराठी साहित्यिकांना माझा नमस्कार,’’ असे म्हणत मराठीतून भाषणास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, ‘आज दिल्लीच्या भूमीवर मराठी भाषेच्या या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एका भाषेपुरते मर्यादित नाही. संत तुकारामांच्या मराठीला दिल्ली अतिशय मनापासून नमन करते, असे मोदी यावेळी म्हणाले आहेत.
‘देशातील तसेच जगातील सर्व मराठी प्रेमिकांना या कार्यक्रमाच्या मी शुभेच्छा देतो आणि आज तर ‘जागतिक मातृभाषा दिवस’ आहे आणि तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवससुद्धा अतिशय चांगला निवडला’, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले.
मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीमध्ये शूरता आहे, वीरता आहे, सौंदर्य आहे, संवेदना आहे, समानता आहे समरसता पण आहे, अध्यात्माचे स्वर पण आहे आणि आधुनिकतेची लहर पण आहे, मराठी भाषेत शक्तीपण आहे, युक्तीपण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, गोरा कुंभार, बहिणाबाई अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली आहे. सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने देखील मोठा बदल घडवला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवासारख्या वीर मराठ्यांनी शत्रूंना नामोहरम केले. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. ‘केसरी’सारखे वृत्तपत्र, राम गणेश गडकरी यांचे नाटक, यातून स्वातंत्र्याच्या लढ्याला चालना मिळाली, असे मोदी म्हणाले.