अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी असलेल्या काश पटेल यांचा ५१-४९ मतांनी विजय झाला. काश पटेल यांच्या उमेदवारीला गुरुवारी सिनेटने मंजुरी दिली आहे.
यानंतर आता काश पटेल यांनी एफबीआयच्या संचालक पदाची शपथ घेतली आहे. काश पटेल यांचा शपथविधी सोहळा सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
काश पटेल जेव्हा एफबीआयचे नवीन संचालक म्हणून शपथ घेण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या हातात भगवद्गीता होती. अमेरिकेत त्यांनी शपथ घेताना भगवद्गीतेवर हात ठेवला आणि नंतर शपथ घेतली. यावरून सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर आपली नवीन टीम गठीत करण्याचे काम सुरु केले आहे. ट्रम्प आपल्या टीममध्ये भारतीय वंशाच्या लोकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवत आहेत. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालकपदावर भारतीय वंशाच्या तुलसी गबार्ड यांची नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय वंशाची गबार्ड अमेरिकेच्या 18 गुप्तचर संस्थांच्या प्रमुख बनल्या आहेत. त्यांनीही भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती.