अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या लष्कराच्या वरिष्ठ लष्करी जनरलला हटवण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल चार्ल्स क्यू. ब्राउन ज्युनियर यांना सेवेतून काढून टाकले आहे. अमेरिकेत सरकार बदल्यानंतर देशाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला अशा प्रकारे काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आता त्यांची जागा अमेरिकन हवाई दलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल डॅन केन घेतील. ब्राऊन यांनी संयुक्त प्रमुखांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना याबाबत म्हंटले आहे.
लेफ्टनंट डॅन केन हे एफ-16 लढाऊ विमानाचे माजी पायलट आहेत आणि गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी सीआयएमध्ये लष्करी व्यवहारांच्या सहयोगी संचालकाचे देखील पद भूषवले आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीच आगामी काळात सैन्यात मोठे बदल होऊ शकतात असे संकेत दिले होते. खरं तर अमेरिकेत जेव्हा सरकार बदलते तेव्हा सामन्यतः देशाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या भूमिकेत कोणताही बदल होत नाही. मात्र, आता ट्रम्प यांच्या या निर्णयाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जनरल चार्ल्स क्यू. ब्राउन ज्युनियर हे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्षपद भूषवणारे दुसरे आफ्रिकन-अमेरिकन होते.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर ‘जनरल चार्ल्स क्यू. ब्राउन ज्युनियर यांचे आभार मानले आहेत. तसंच त्यांना चांगला आणि सौम्य माणूस म्हणून संबोधले आहे. पुढे त्यांनी चार्ल्स यांचे आभार मानले आहेत. चार्ल्स यांनी 40 वर्षांहून अधिक अमेरिकेची सेवा केली याबद्दल त्यांचे आभार मानतो असं ट्रम्प यांनी म्हंटल आहे. तसंच पुढे त्यांना व त्याच्या कुटुंबाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर देखील टीका केली आहे. बायडेन यांनी त्यांच्या सत्ताकाळात लेफ्टनंट जनरल डॅन केन यांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष केलं. ते जॉइंट चीफ ऑफ स्टाफमध्ये सेवेसाठी अधिक पात्र असूनही झोपी गेलेल्या बायडेन प्रशासनाने लेफ्टनंट जनरल केन यांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष केले”, असं म्हणत बायडेन यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, चार्ल्स सी.क्यू. ब्राउन ज्युनियर यांच्याशिवाय संरक्षण विभागातील आणखी 5 अधिकाऱ्यांना हटवण्यात आले आहे. यामध्ये प्रथमच नौदलाचा पदभार स्वीकारणाऱ्या ॲडमिरल लिसा फ्रँचेट्टी, हवाई दलाचे उपप्रमुख जेम्स स्लाइफ, लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या तीन सर्वोच्च वकिलांचा समावेश आहे.