पंतप्रधान नरेंद्र मोदी या 12 मार्चला मॉरिशसला जाणार आहेत. मॉरिशसच्या 57 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, देशाने पंतप्रधान मोदींना सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. याची माहिती मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी दिली आहे. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान म्हणाले की, ‘अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचे यजमानपद आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे.’
मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम यांनी 57 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदी यांना निमंत्रण पाठवले होते. पंतप्रधान मोदींनी त्यांचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर मॉरिशसच्या पंतप्रधानांनी स्वतः ही याबद्दल माहिती दिली आहे. यावर्षी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान रामगुलाम म्हणाले, ‘माझ्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे मान्य केले आहे, हे कळवताना मला खूप आनंद होत आहे. आपल्या देशासाठी हा खरोखरच एक विशेष सन्मान आहे की आपण अशा प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाचे यजमानपद भूषवत आहोत जे आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्याला हा सन्मान देत आहेत. अलीकडेच त्यांनी पॅरिस आणि अमेरिकेला भेट दिली पण तरीही त्यांनी आमचे विशेष अतिथी म्हणून येथे येण्याचे मान्य केले आहे.’ असं मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी म्हंटल आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 2024 मध्ये, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मॉरिशसच्या 56 व्या स्वातंत्र्य दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.