पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कामगारांच्या हितासाठी कार्यरत आहेत. त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून संघटित आणि असंघटीत मजुर, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता मजदूर सेल कायम कामगार हितासाठी प्रयत्नशील राहिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आणलेल्या कामगार हिताच्या १६७ योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करत असून असंघटित कामगारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य असल्याचे भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमन विष्णुप्रिय रॉय चौधरी यांनी सांगितले.
भारतीय जनता मजदूर सेलच्या राष्ट्रीय सचिवपदी पुण्यातील संजय आगरवाल तर महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्ष पदी जयेश टांक यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांचा नियुक्ती पत्र प्रदान सोहळा आज शुभारंभ लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत विष्णुप्रिय रॉय चौधरी बोलत होते. यावेळी अखिल भारतीय जनता मजदुर (सेल) अध्यक्ष अर्णब चॅटर्जी, युवा अध्यक्ष दीपक शर्मा, महाराष्ट्र महिला अध्यक्ष सविता पांडे, उमेश शहा,अशोक राठी,सुनील ज्यांज्योत,दिलीप आबा तुपे,नितीन शितोळे,राजेंद्र गिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विष्णुप्रिय रॉय चौधरी म्हणाले, राज्य व केंद्रातील सरकार कामगारांचे हित जोपासण्यावर भर देत आहेत, मात्र कंत्राटी कामगार आणि असंघटीत कामगारांचे प्रमाण मोठे आहे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा सेल प्रयत्नशील आहे. देशात सरकारच्या विविध योजना असंघटीत कामगारांसाठी आहेत, परंतु त्यांच्या पर्यंत पोहचत नाहीत, त्या पोहचल्या पाहिजे यासाठी आम्ही प्राधान्य क्रमाने काम करण्याचे ठरवले आहे. पीएफ, इएसआय आदि बाबी कामगारांना मिळतात किंवा नाही हे तपासण्याचे काम आम्ही करत आहोत, कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अर्णब चॅटर्जी म्हणाले, महाराष्ट्रात सेलचे काम चांगले सुरू आहे. मागील तीन वर्षात आम्ही राज्यात २०० पेक्षा अधिक जास्त शाखा सुरू केल्या आहेत. इतर कामगार संघटनेच्या तुलनेत आम्ही चांगले काम करत असल्याने विविध प्रकारच्या कामगार निवडणूक मध्ये चांगले यश मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील, देशातील कामगारांचे हित जोपासण्यासाठी आणि संघटनेच्या वाढीसाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना कामगार, मजुर लोकांपर्यंत पोहवण्याचे काम करू असे संजय आगरवाल आणि जयेश टांक यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.