गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे. ही घसरण अजूनही थांबवण्याचे नाव घेत नाहीये. आज देखील शेअर बाजार घसरणीसह उघडला आहे.
सोमवारी शेअर बाजार उघडताच सर्व भागात विक्री दिसून आली. सकाळी सेन्सेक्स 418 अंकांनी घाली येऊन 74,893 वर, तर निफ्टी 186 अंकांनी घसरून 22,609 वर उघडला. बाजार उघडल्यानंतर यात आणखी घसरण दिसून आली. सकाळी 10 वाजता सेन्सेक्स 729 अंक घसरून 74581 वर पोहोचला आहे. तर, निफ्टीने घसरणीचे दुहेरी शतक गाठले. निफ्टी 228 अंकांनी घसरून 22568 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
शेअर बाजारातील या घसरणीचे मुख्य कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात घेतलेले निर्णय असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी काही देशांना दिलेल्या दरवाढीच्या धमकीमुळे अमेरिकेत महागाईचे वातावरण आहे अशातच याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहेत.
निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरण एचसीएल आणि टीसीएस टेकमध्ये झाली आहे. कंपनीचा शेअर 3 टक्क्यांनी खाली आला. याशिवाय विप्रो, श्रीराम फाइनन्स, टेक महिंद्रा आणि ट्रेंटमध्येही 2 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. तसेच झोमॅटोच्या शेअरमध्ये देखील मोठी घसरण दिसून आली.
तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअर्समध्येही पडझड दिसून आली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये, सेन्सेक्स 30 मधील M&M, सन फार्मा, मारुती, बजाज फिनसर्व आणि नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली.
दरम्यान, अमेरिकेसह आशियातील बाजारातही अशीच स्थिती दिसून आली आहे. ज्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.