1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावलीय. राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या दंगलींशी संबंधित एका प्रकरणात सज्जन सिंग यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, सध्या ते तिहार तुरुंगातून शिक्षा भाेगत आहेत.
१ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीत झालेल्या दंगलीवेळी सरस्वती विहार परिसरात जमावाने पिता-पुत्राची हत्या केली हाेती. या प्रकरणी न्यायालयाने सज्जन कुमार यांना १२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरवले होते. आज दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
https://twitter.com/ANI/status/1894304974735380593
काय आहे प्रकरण?
सज्जन कुमार यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शीखविरोधी आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी मोठ्या प्रमाणात लूटमार, जाळपोळ आणि शीख मालमत्तेची नासधूस केली होती. या आंदोलनावेळी त्यांनी एका शीख घरात घुसून जसवंत आणि त्याच्या मुलाची हत्या केली होती. तसंच त्यांच्या सामानाची लूट केली व त्यांच्या घराला आग लावली. अशी फिर्याद त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती. सज्जन कुमार हे या आंदोलनात केवळ सहभागीच नव्हते तर त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्वही केले होते. यासंबंधित सगळे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यांच्याविरोधी सगळे पुरावे मिळाल्यानंतर व त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत दोषी ठरवले होते.
सज्जन कुमार यांच्या विरुद्ध दंगल, खून आणि दरोडा या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, १४८, ३०२, ३०८, ३२३, ३९५, ३९७, ४२७, ४३६, ४४० अंतर्गत गुन्हा दाखल आहे.