राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीच्या पृष्ठभूमीवर पद्मश्री रमेश पतंगे यांचे “आम्ही संघात का आहोत हे पुस्तक संघ समजावून घेऊन इच्छिणाऱ्या व संघात अनेक वर्ष असलेल्यांना उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी येथे बोलताना केले.
कार्यकर्ता – विचारवंत असलेल्या पतंगे यांच्या या पुस्तकात प्रदीर्घ स्वानुभवाचे मुद्देसूद विश्लेषण असून संघाच्या सामर्थ्य स्थळांची त्यात उचित चर्चा केलेली आहे. संघात जाणे ही संघ स्वयंसेवकांची साधना असून त्याच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर त्याला संघाची व्यापक ओळख उलगडत जाते असे ते म्हणाले.
संघ कार्यपद्धती हि हृदयस्पर्शी असून त्यामुळेच संघाचे “संस्था” हे स्वरूप न राहता ते “जैविक संघटन” म्हणून राहिलेले आहे याची अनेक उदाहरणे पतंगे यांनी पुस्तकात दिलेली आहेत.
भारताच्या संविधानातील “बंधुता” हे वैशिष्ट्य संघकार्यपद्धती पद्धतीत सहजगत्या निर्माण होते हे संघाचे लोकशाहीसाठी मोठे बलस्थान असल्याचे क्षीरसागर म्हणाले.
गो विज्ञान संस्था, सक्षम व एक मे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.दीपक बोकील यांनी परिचय करून दिला. प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री व संभाजी विभाग संघचालक अनिलजी व्यास यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी “शिल्पकार चरित्रकोश” चे महेश पोहनेरकर हे उपस्थित होते. “साप्ताहिक विवेक”चे धनाजी जाधव यांनी आभार मानले.