पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या घटनेने पूर्ण पुणे हादरून उठलं आहे. स्वारगेट परिसरात बसमध्ये एका महिलेवर झालेल्या बलात्कारानंतर राज्यातील बस स्थानकाच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या गंभीर प्रकरणानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, महाराष्ट्र परिवहन विभाग अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
पुण्यातील बस्थानकावर घडलेल्या त्या प्रकारानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
अनेक महत्वाचे निर्णय घेत बस्थानकावरील सुरक्षा वाढवली आहे. तसेच बस्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानकावरील महिला, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन हे पाऊल उचण्यात आले आहे.
बस प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची विनंती परिवहन विभागाने गृह विभागाला केली आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्था बळकट होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कारवाई करणे शक्य होईल.
तसंच राज्यातील सर्व बस स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जातील आणि डेपोमध्ये आणि आसपास सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जाईल. असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
याचबरोबर प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी राज्यातील 14 हजार बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्यात येणार असल्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने बसमधील कोणत्याही संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवले जाईल व जीपीएस सिस्टीमद्वारे बस कुठे आहे याची माहिती मिळेल. या गोष्टींचा अवलंब करून सुरक्षा नियंत्रण कक्षाला प्रत्येक बसची अचूक माहिती मिळेल. आणि बसमध्ये सुरु असलेले गैरप्रकार पुढे येतील व त्वरित कारवाई करता येईल.
तसेच महाराष्ट्रात सर्व बंद आणि न वापरलेल्या बसेस 15 एप्रिल 2025 पूर्वी स्क्रॅपमध्ये पाठवण्यात येतील जेणेकरून बसस्थानकावर अशा बसेसचा गैरवापर होणार नाही. अशी माहिती देखील प्रताप सरनाईक यांच्याकडून देण्यात आली आहे.
यासोबतच महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळेल. महिला सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीमुळे कोणतीही अनुचित घटना टाळण्यास मदत होईल.
तसेच वाहतूक व्यवस्थेची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या तंत्रज्ञानामुळे सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून संशयास्पद हालचाली ओळखण्यास मदत होईल. एआयच्या माध्यमातून बसेसचे निरीक्षण आणि प्रवाशांच्या सुरक्षेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल. अशी माहिती देखील प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.