इंडिया गॉट लेटंट कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलेल्या युट्यूबर रणवीर अलाहबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रणवीर अलाहाबादियाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत इतर कोणताही कार्यक्रम यूट्यूवबर प्रसारित करण्यापासून रोखलं होत.
मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला सोशल मीडियावर त्याचं पॉडकास्ट आणि शो अपलोड करायला परवानगी दिली आहे. मागील सुनावणीत न्यायालयाने अलाहाबादियाला त्याचं पॉडकास्ट प्रसारित करण्यास मनाई केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला दिलासा दिला आहे. मात्र, असे असले तरी त्याच्या पॉडकास्टमध्ये आक्षेपार्ह काही प्रसारित होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या एका भागात रणवीर अलाहाबादियाने हजेरी लावली होती. हा भाग यूट्यूबवर व्हायरल होताच रणवीर अडचणीत आला. या भागात रणवीरने एका स्पर्धकाला पालकांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्याच्या या वक्तव्याविरोधात अनेकांनी आवाज उठवत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. गेल्या हप्त्यात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने रणवीरचा पासपोर्ट जप्त केला असून, पुढील आदेशापर्यंत त्याला बाहेरील देशात जाता येणार नाही.