१४४ वर्षांनी आलेल्या ऐतिहासिक महाकुंभ मेळ्याची सांगता महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच २६ फेब्रुवारी रोज शेवटच्या स्नानाने झाली. जगातील या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात, भारत आणि परदेशातील ६६ कोटींहून अधिक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभासाठी मोठी व्यवस्था केली होती.
मात्र, मौनी अमावस्येदरम्यान असे काही झाले की, संपूर्ण महाकुंभावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. महाकुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली होती. यात ३० जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक भाविक जखमी झाले होते. यानंतर मात्र, विरोधकांकडून योगी सरकारच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली.
या सगळ्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा सरकराकडून चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावर स्पष्टीकरण देताना योगी म्हणाले की, ‘परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवल्यात आली.’
योगी म्हणाले, ‘आम्ही या घटनेची जास्त प्रसिद्धी होऊ दिली नाही, कारण त्यावेळी प्रयागराज आणि कुंभमेळा परिसरात आठ कोटी भाविक आणि संत उपस्थित होते. आणि जर या चेंगराचेंगरीची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झाली असती तर याठिकाणची परिस्थिती आणखी बिघडू शकली असती. आणि म्हणूनच चेंगराचेंगरीची माहिती लपवली असल्याचे स्पष्टीकरण योगी यांच्याकडून देण्यात आले.
पुढे योगी म्हणाले, “अशावेळी लोक लवकर घाबरतात आणि हार मानतात, पण संयम आणि नियंत्रणाने ठोस निर्णय घेण्याची शक्ती आपण विकसित केली पाहिजे,” असंही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.