‘इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारावरुन मी औरंगजेबाचं कौतुक केलं. मी महापुरुषांविषयी किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो. माझं वक्तव्य एक राजकीय मुद्दा बनलं आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय.’ असं स्पष्टीकरण समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दिलं आहे.
नुकतंच आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत एक वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात एकच गोंधळ सुरु झाला व त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागली. औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे निलंबनाची टांगती तलवार लटकत असताना त्यांनी आपले शब्द मागे घेतले आहेत.
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला. व अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर आता आझमी यांनी जनतेची माफी मागत आपलं व्यक्तव्य मागे घेतले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नुकताच बॉलिवूड चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे अनेक क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. तसेच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हे अत्याचार औरंगजेबाने केले होते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर औरंगजेबाचा निषेध करण्यात येत होता. यादरम्यान सापा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता वगैरे म्हणत त्याचं कौतुक केलं. ज्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीका करण्यात आली तसेच, अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला आणि त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. या प्रकरणानंतर आता अबू आझमी यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागितली आहे.