राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या असह्य झळा जाणवू लागल्याने यंदाचा उन्हाळ्यात तीव्र उष्णतेला समोर जावं लागण्याची भीती असताना भारतीय हवामान विभागाने या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मार्च ते मे दरम्यान देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून महाराष्ट्रात देखील यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
सध्या राज्यासह देशातील विविध भागांत तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान आता मार्च महिना सुरु झाला आहे. हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात २ ते ३ अंशांनी तापमान वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे ही सांगण्यात येतंय. दुसरीकडे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-उत्तर भारतात २ मार्चपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. विशेषत: २ मार्चपासून इंदूर, ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काही ठिकाणी हवामान बदलू शकते. याआधी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होणार आहे.