अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या तणावपूर्ण बैठकीनंतर अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने नुकतीच युक्रेनला सैन्य मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून रवाना झालेली मदत देखील मधेच थांबवण्यात आली आहे.
यासंबंधित व्हाईट हाऊसकडून आलेल्या एक निवेदनात म्हंटले आहे की, ‘अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना जो पर्यंत खात्री पटत नाही की, युक्रेनला खरंच शांतता हवी आहे तो पर्यंत ही मदत थांबवण्यात येत आहे.’
युक्रेनला मदत थांबवण्यापूर्वी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी म्हंटले होते की, ‘युक्रेनला जोपर्यंत अमेरिकेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत त्यांना शांतता नको आहे. झेलेन्स्की यांनी केलेले हे विधान आहे. अमेरिका हे सहन करणार नाही.’ अशी पोस्ट युक्रेनला मदत थांबवण्यापूर्वी ट्रम्प यांनी केली होती.
मागील हप्त्यात युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली होती. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये बैठक पार पडली.
या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्दयांवर चर्चा सुरु होती. या चर्चेत ट्रम्प यांनी रशियाशी करारात युक्रेनला नमते घ्यावे लागेल असा इशारा दिला. मात्र, युक्रेनकडून हा इशारा धुडकावून लावण्यात आला आणि तिथेच दोन्ही देशात वादाची ठिणगी पडली आणि वाद रंगला. त्यानंतर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस सोडावे लागले होते. यानंतर दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडल्याचे दिसून आले. आणि आता ट्रम्प यांनी सैन्य मदत थांबवण्याची घोषणा केली.
अमेरिकेकडून मदत थांबल्यास युक्रेनवर काय परिणाम होईल?
गेल्या तीन वर्षांपासून रशियाविरुद्धच्या संघर्षात युक्रेनला शस्त्रे, दारूगोळा आणि आर्थिक सहाय्य पुरवत अमेरिका युक्रेनची प्रमुख समर्थक राहिली आहे. ही मदत थांबवल्याने युक्रेनच्या संरक्षण क्षमतेवर लक्षणीय परिणाम होईल. युक्रेनचे सैन्य अमेरिकेच्या शस्त्रांवर, विशेषतः तोफखाना, ड्रोन आणि क्षेपणास्त्र प्रणालींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या बंदीनंतर युक्रेनला रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे कठीण होईल आणि त्याच वेळी रशिया युक्रेनच्या आणखी काही भागांवर कब्जा करू शकेल.