विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पहिल्याच दिवशी आमदार अबू आझमीनी औरंगजेबवर एक विधान केले होते. यानंतर विधिमंडळात गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षातील आमदारांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. तसेच त्यांच्या विरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. दरम्यान, आता हा प्रस्तान सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमीचे निलंबन करण्यात आले आहे.
आता अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होता येणार नाही. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत अबू आझमींवर विधानसभेच्या इमारतीच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
अबू आझमी काय म्हणाले होते?
नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हे अत्याचार औरंगजेबाने केले होते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर औरंगजेबाचा निषेध करण्यात येत होता. यादरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सापा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता वगैरे म्हणत त्याचं कौतुक केलं होत. ज्यानंतर सर्वत्र त्यांच्यावर टीका करण्यात आली व अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला आणि त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती.
आपल्यावर निलंबनाची कारवाई होऊ नये म्हणून अबू आझमींनी मंगळवारी आपल्या एक्स अकाऊंटवरुन स्पष्टीकरण देत आपलं विधान मागे घेतलं होतं. “माझ्या शब्दांना मोडून-तोडून दाखवण्यात आलं. औरंगजेबबद्दल मी तेच म्हटलं जे इतिहासकारांनी आणि लेखकांनी म्हटलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजा, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल अपमानकारक विधान केलेलं नाही. मात्र तरीही माझ्या वक्तव्याने कोणी दुखावलं गेलं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. अशी पोस्ट त्यांनी केली होती.