उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवाद्याला अटक करण्यात मोठं यश आलं आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात आज पहाटे उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाजर मसीह अटक केली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी लाजर मसीह हा पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी आहे.
समोर आलेल्या महतीनुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी लाजर मसीह हा बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या जर्मन-आधारित मॉड्यूलचा प्रमुख स्वर्ण सिंग उर्फ जीवन फौजीसाठी काम करत होता. तसेच तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या थेट संपर्कात होता.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत लाजर मसीहकडून तीन जिवंत हँडग्रेनेड, दोन डेटोनेटर्स, १३ काडतुसे, विदेशी पिस्तूल आणि स्फोटक पदार्थाची पावडर जप्त केली आहे. त्याच्याकडे गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि एक मोबाईल फोनही सापडला आहे.
दहशतवादी लाजर मसीह हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या संपर्कात होता. तो २४ सप्टेंबर २०२४ रोजी पंजाबमधील न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता. मात्र, आता त्याला ताब्यात घेतला असून, त्याची पुढील चौकशी केली जात आहे.
दरम्यान, यापूर्वी अब्दुल रहमान नावाच्या दहशतवाद्याला ३ मार्च रोजी हरियाणातील फरीदाबाद येथील बान्स रोड पाली येथून अटक करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेने अब्दुल रहमानला अयोध्या राम मंदिरावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण दिले होते. ISISची शाखा असलेल्या इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताने या हल्ल्याचा कट रचला हाेता, अशी माहिती तपासात समाेर आली आहे