लखनऊ कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. लखनऊ कोर्टाने वीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी ते सुनावणीच्या वेळी कोर्टात गैरहजर होते ज्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यासोबत कोर्टाने दंडाची रक्कम वादी पक्षाचे वकील नृपेंद्र पांडे यांनी देण्यात यावी असा आदेश देखील दिला आहे.
तसेच कोर्टाने राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर राहुल गांधी या तारखेला कोर्टात उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील कोर्टाकडून देण्यात आला आहे.
17 डिसेंबर 2022 रोजी अकोला येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख ‘ब्रिटिशांचे सेवक’ आणि ‘पेन्शनधारक’ असा केला होता. या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे.
राहुल गांधींच्या या विधानाविरुद्ध नृपेंद्र पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात धाव घेतली. राहुल यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153(अ) आणि कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.