मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एका मोठा धक्का बसला आहे. त्याने नुकतीच भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली आहे. यापूर्वीही राणाने प्रत्यार्पण रोखण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
अमेरिकेत ट्रम्प सरकारस्थापन झाल्यानंतर तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. भारताने अमेरिकेकडे अनेकवेळा तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
दरम्यान, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यापासून राणा प्रत्यार्पण रोखण्यासाठी सातत्याने न्यायालयात धाव घेत आहे.
नुकतीच राणाने आपल्या प्रत्यार्पणाला स्थगिती द्यावी, अशी याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. जर मला भारतात प्रत्यार्पण केले गेले तर माझ्यावर अत्याचार केला जाईल, असे तहव्वूर राणाने याचिकेत म्हटले होते.
आपल्या याचिकेत तहव्वूर राणा नेमकं काय म्हणाला होता? पाहूया…
राणाने अमेरिकन न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत म्हटले होते की, ‘तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्यामुळे भारतात त्याच्यावर खूप अत्याचार केले जातील. भारत सरकार अधिकाधिक हुकूमशाही बनत आहे अशा स्थितीत जर मला भारत सरकारच्या ताब्यात दिले तर माझा छळ केला जाईल. त्यामुळे माझे प्रत्यार्पण थांबवा…’ अशी नवी शक्कल त्याने प्रत्यार्पण रोखण्यासाठी लढवली होती. मात्र, न्यायालयाने त्याला पुन्हा धक्का दिला असून त्याची ही याचिका फेटाळली आहे.
कोण आहे तहव्वूर राणा ?
तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तो वाँटेड असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने दीर्घकाळापासून केली होती. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे. त्याचा मुंबई हल्ल्यात सहभाग होता असा आरोप त्याच्यावर आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कॉलमेन हेडलीशी त्याचा संबंध असल्याचे मानले जाते. दरम्यान, या प्रकरणी डेविड कॉलमेन याला सरकारी साक्षीदार बवण्यात आले आहे.