‘औरंगजेबाची कबर उद्धवस्त करायची आहे. म्हणजे काय कराचयं आहे, यावर कोणी काय बोलत नाही. रोज तेच-तेच बोलले जात आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. शांतता-सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. त्यावर कोणी बोलत नाही. केवळ दररोज औरंगजेबावर बोललं जात आहे. इतिहासातून औरंगजेब काढू शकत नाही. औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून, शिवाजी महाराज हिरो झाले’, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुघल बादशाह औरंगजेब याचा छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तिथून हटवण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यावर आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर औरंगजेबावरून वाद आणखीनच चिघळणार असलायचं चित्र आहे.
दरम्यान, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी नुकतंच ‘औरंगजेब क्रूर शासक नव्हता’, असं विधान केलं होत. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. नंतर आझमी यांनी आपले शब्द मागे घेतले होते. पण त्यांना त्यांच्या वक्तव्यामूळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेतून निलंबित केले होते.