विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभर सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहत आहेत. नुकतंच काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकर यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य 100 पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत.
पुण्यातील काँग्रेसमध्ये असंतोष वाढल्याने पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर रवींद्र दंगेकर यांनी देखील पक्षाला राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, येत्या 2-3 दिवसांत 100 पदाधिकारी काँग्रेसला रामराम ठोकणार असून, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे चित्र आहे.
सुरवसे पाटील हे काँग्रेसचा राजीनामा देणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच सुरवसे पाटील यांनी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली होती. आता येत्या २ ते ३ दिवसांमध्ये सुरवसे पाटलांसह युवक काँग्रेसचे १०० पदाधिकारी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.