महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्यातील अनेक राजकीय आणि धार्मिक संघटना खुल्ताबाद येथील कबरीला हटवण्याची मागणी करत आहेत. औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्रात नकोच, अशा शब्दात काही नेत्यांनीही निषेध दर्शवला आहे.अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. असे आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला दिले आहे.
“खरंतर एएसआयनं पन्नास वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात कबरीला संरक्षण दिलं होतं. त्यामुळे या कबरीचं संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारवर येऊन पडली आहे. ज्या औरंगजेबानं आमच्या हजारो लोकांची हत्या केली. त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागत आहे. हे दुर्देव आहे. मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही. कबरीचं उदात्तीकरण कधीही होऊ देणार नाही. तसेच जर कुणी कबरीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला तर, तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही” असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही कबर हटवायची असल्यास या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही,असेही फडणवीस म्हणाले आहेत.
शिवजंयतीच्या मुहूर्तावर आज सोमवारी भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्यदिव्य मंदिराचं उद्घाटन करण्यात आले आहे. हा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगजेबाच्या कबरीवरून प्रतिक्रिया देत म्हणाले की, ‘आज यातून एक संदेश निश्चितपणे जात आहे. या देशामध्ये महिमामंडन होईल. तर, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे होईल. पण औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही’, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.