भारती प्रतापराव पवार (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल, तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकिर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारती पवार या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्यामंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर २२ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.
सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रमांत सहभाग घेतला. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत असत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, तसेच ‘सकाळ’ संचालित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत असत.