नागपूरमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले.खुल्ताबाद मधील औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन याठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली होती. यानंतर वातावरण शांत झाले होते. मात्र यामुळे अस्वस्थ झालेल्या समाजविघटक जमावाने दगडफेक तसेच जाळपोळ केली आहे. संतप्त झालेल्या एका गटाने सायंकाळी ७.३० नंतर नागपूर ,मधील महाल परिसरामध्ये तुफान दगडफेक करून गाड्यांची जाळपोळ केली. यानंतर तिथे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी परिस्थिती आटोक्यात आणायचा प्रयत्न केला . यामध्ये नागपूरचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला असून ज्यामध्ये ते जखमी झालेआहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाल परिसरामध्ये तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्याचा वापर करावा लागला आहे.
सध्या ही तणावपूर्ण परिस्थिती पोलिस प्रशासन हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे.