नागपुरात सोमवारी रात्री औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक जाळपोळ झाल्याची घटना घडली आहे. नागपुरात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. तसेच शहरात सुरु असलेल्या दंगलीमुळे काही शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, ‘पुढच्या सूचना मिळेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. दरम्यान, कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर येथील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारंबदी लागू करण्यात आली आहे. तसंच, शहरातील काही रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.
Nagpur (Maharashtra) violence | Curfew has been imposed in the Police station limits of Kotwali, Ganeshpeth, Lakadganj, Pachpaoali, Shantinagar, Sakkardara, Nandanvan, Imamwada, Yashodhara Nagar and Kapil Nagar in Nagpur city. This curfew will remain in force until further… pic.twitter.com/N3CqzKcMv1
— ANI (@ANI) March 17, 2025
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुघल बादशाह औरंगजेब याचा छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कबरीचा मुद्दा चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर तिथून हटवण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या विषयावर अनेक राजकीय नेतेमंडळी देखील वक्तव्य करत आहेत.
याचदरम्यान, काल नागपूरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता. या मोर्चात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. आणि दोन गटांमध्ये तुफान दगफेक झाली. यानंतर शहरातील परिस्थिती बिघडली. पोलीस पथकाने शहरातील परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शहरात कोणताही राडा होऊ नये या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंधित कोणीही नियम मोडले तर त्यावर कारवाई करण्यात येईल. असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.