सोमवारी रात्री इस्राईलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात 235 लोक मारले गेले आहेत. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इस्राईलने युद्धविराम करार पुन्हा वाढवण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या युद्धविराम प्रस्तावाला नाकारत इस्राईलने हमासविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू करत गाझा पट्टीवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याची माहिती पंतप्रधान कार्यलयाकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यलयाने सादर केलेल्या निवेदनात इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले आहेत की, ‘युद्धविराम पुढे नेण्याच्या चर्चेत प्रगती न झाल्यामुळे हल्ल्याचे आदेश देण्यात आले आहेत.’
हमास आणि इस्राईल यांच्यात 19 जानेवारीला शस्त्रसंधी करार झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंकडून होणारी लढाई थांबेल, असा निर्णय घेण्यात आला. आता या कराराला मुदतवाढ देण्याबाबत दोघांमध्ये मतभेद आहेत. अशातच पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली असून, दोन्ही बाजूनी हवाई हल्ले सुरु आहेत.
युद्धबंदी कराराअंतर्गत इस्राईलने हमासच्या 2,000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. तर हमासने बंदिस्त केलेल्या २०० पैकी ३६ इस्राईली नागरिकांची सुटका केली आहे.
दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी युद्धविराम कराराचा पहिला टप्पा संपल्यामुळे, उरलेल्या इस्राईली नागरिकांची सुटका अजून बाकी आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील युद्ध विराम करार पुढे नेण्यासाठी दोन्ही बाजूनी सहमती न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही कडून हल्ले सुरु झाले आहेत.
ऑक्टोबर 2023 पासून तणाव
इस्राईल आणि हमास यांच्यात ऑक्टोबर 2023 पासून तणाव सुरू आहे. हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्राईलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान, अनेक इस्राईली नागरिकांना बंधक बनवून ठेवले होते. त्यांचीच सूटका युद्धबंदी करारानुसार केली जात आहे. या करारात इस्राईलने दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आणि त्या बदल्यात हमासने ईस्रायली बंधकांची सुटका केली. यामुळे परिसरात शांततेची आशा निर्माण झाली होती, मात्र, आता पुन्हा युद्ध सुरु असून, गाझापट्टीत पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.