राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री असताना नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी लालू यादव यांना ईडीने समन्स बजावले आहे. उद्या लालू यादव यांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनाही ईडीने या प्रकरणात आज चौकशीसाठी बोलवले आहे.
यापूर्वीही ईडीने लालू यादव यांची चौकशी केली होती. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. मात्र, आता काही नवे पुरावे हाती लागल्याने त्यांना पुन्हा समन्स वाजवण्यात आला असून, त्यांची उद्या म्हणजेच बुधवारी चौकशी करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिनी घेतल्याचा आरोप आहे. तसेच भरती नियमांचेही उल्लंघन करण्यात आल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवला होता आणि त्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना उमेदवारांना त्यांच्या कुटुंबीयांच्या व सहकाऱ्यांच्या नावे जमिनी हस्तांतरित करण्यास सांगितले व त्या बदल्यात रेल्वेत नोकरी देण्यात आली.
18 मे 2022 रोजी सीबीआयने लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मुलगा तेज प्रताप यादव व त्यांच्या जवळचे सरकारी अधिकारी व काही खाजगी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आतापर्यंत 30 आरोपींविरुद्ध खटला चालवण्यास मंजुरी मिळाली आहे.
2004 ते 2009 पर्यंत भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये ग्रुप डी पदांवर अनेकांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या बदल्यात या उमेदवारांनी लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नावे जमिनी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी सीबीआयने 10 ऑक्टोबर 2022 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 16 जणांना आरोपी करण्यात आले होते. जुलै २०२२ मध्येच सीबीआयने भोला यादव यांना अटक केली होती. जे लालू यादव रेल्वे मंत्री असताना त्यांचे ओएसडी होते.
नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान पश्चिम-मध्य रेल्वेच्या जबलपूर झोनमध्ये ग्रुप-डी पदांवर झालेल्या नियुक्त्यांशी संबंधित आहे.