Sunita Williams: अखेर नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर अंतराळातून आज (दि. १९ मार्च रोजी) पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे 3.30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ते सुरक्षितपणे उतरले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर हे इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत.
सुनिला विल्यम्स आणि बुच विल्मर अंतरळात केवळ आठ दिवसांसाठी गेले होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना तब्बल नऊ महिने अंतरळावर राहावे लागले. या निमित्ताने सुनिता विल्यम्स यांच्या नावावर एक विक्रम रचला गेला आहे. अंतराळावर सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून एक नवा विक्रम सुनिता विल्यम्स यांच्या नावावर प्रस्थापित झाला आहे.
नऊ महिन्यांच्या अंतराळावरील मुक्कामादरम्यान, सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. यावेळी त्यांनी 150 हून अधिक नवीन प्रयोग, अभ्यास आणि संशोधन केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केल्याची माहिती समोर आली आहे.
सुनीता विल्यम्स व बुच विल्मर पृथ्वीवर सुखरूप परतले असले, तरी त्यांना त्वरीत पूर्वीसारखे सामान्य आयुष्य जगता येणार नाही. कारण नऊ महिने एका वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळं त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना पुढील ४५ दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत. या उपचारादरम्यान त्यांना पृथ्वीवरील वातावरणाशी त्यांच्या शरीराला जुळवून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.