MPSC Exam Date: स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी गेली कित्येक महिने राजपत्रित पूर्व परीक्षेच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत होते. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तात्पुरत्या वेळापत्रकात राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र मार्च महिना उलटला तरी जाहिरात न आल्याने विद्यार्थी मेटोकुटीला आले होते. अखेर मंगळवारी (दि. 18 मार्च 2025 रोजी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
एकूण 385 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात सामान्य प्रशासन विभाग- राज्यसेवा- 127, महसूल व वन विभाग- महाराष्ट्र वनसेवा-144 आणि सार्वजनिक बांधकाम विभाग-स्थापत्य अभियांत्रिकी सेवा-114 अशा विभागनिहाय जागा असणार आहेत. राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 (MPSC Prilims Exam Date) रोजी होणार आहे. त्यासाठी 28 मार्च ते 17 एप्रिलपर्यंत उमेदरवार अर्ज करू शकतात. तर 17 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत चलनाद्वारे शुल्क भरता येणार आहे. राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर(MPSC Exam Center) ही परीक्षा होणार आहे.
विशेष म्हणजे या जाहिरातीतील जांगासाठीची मुख्य परीक्षा ही वर्णात्मक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा जुना पॅटर्न विसरून वर्णात्मक पद्धतीने तयार करावी लागणार आहे. परंतु सध्या 385 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.