Manipur Violence:मागील काही महिन्यांमध्ये मणिपूरमध्ये अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या. परंतु काही कालावधीनंतर हिंसाचार थांबला होता. अशातच आता मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
झोमी-हमार या दोन जमातींमधील संघर्षामुळे हा हिंसाचार घडला आहे. यापूर्वी दोन्ही गटांनी चुराचांदपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे मान्य केले होते. मात्र, झोमी गटाचा ध्वज काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे वाद सुरू झाला होता. या वादात जमावाने दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांना हवेत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि गोळ्या झाडाव्या लागल्या.
या सगळ्या हिंसाचारात गोळी लागून एकाचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव लालरोपुई पखुमते असे आहे. त्याला कोणी गोळी मारली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच या हिंसाचारात अनेकजण जखमीही झाल्याची माहिती समोर आली आहे.
या जमावाने चुराचांदपूर जिल्हा रुग्णालयावरही हल्ला केला होता. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास काही लोक शस्त्रे हातात घेऊन रुग्णालयात घुसले. या लोकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना धमकावले. त्यामुळे बुधवारी त्या रूग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या होत्या. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने हिंसाचार घडलेल्या परिसरात कलम 144 लागू केले होते. त्यानंतर परिस्थीती काहीशी अटोक्यात आली.