अमेरिकेतील जॉर्जटाऊन विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी बदर खान सुरी याला अटक करण्यात आली आहे. बदर खान याच्यावर हमासचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.बदर खान सुरी हा तिथे पोस्ट-डॉक्टरेट फेलो होता. मात्र आता त्याला अमेरिकेतून हद्दपार करण्यात येणार आहे. बदर खानच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी(दि.१७) रात्री त्याला व्हर्जिनिया येथील त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.
सूरी जॉर्जटाऊन विद्यापीठात विद्यार्थी होता आणि तिथे हमासचा प्रचार करत होता. तो सोशल मीडियावर यहूदीविरोधी भावनांना प्रोत्साहन देण्यात सक्रिय होता असे होमलँड सिक्युरिटी विभागाच्या सहाय्यक सचिव ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे .
तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी १५ मार्च २०२५ रोजी एक आदेश जारी केला, ज्यामध्ये असे म्हटले होते की सुरीच्या कारवाया आणि अमेरिकेतील त्याच्या उपस्थितीमुळे त्याला आयएनएच्या कलम २३७(अ)(४)(सी)(आय) अंतर्गत हद्दपारीची शिक्षा होऊ शकते.
हा बदर खान सूरी आहे कोण ?
बदर खान सुरी हे जॉर्जटाऊन विद्यापीठातील अलवालीद बिन तलाल सेंटर फॉर मुस्लिम-ख्रिश्चन अंडरस्टँडिंगमध्ये पोस्टडॉक्टरल फेलो आहे. २०२० मध्ये त्याने जामिया मिलिया इस्लामिया येथून शांतता आणि संघर्ष अभ्यासात पीएचडी केली आहे.
त्याची पत्नी माहीजी साहले, अमेरिकन नागरिक असली तरी मूळची गाझा येथील आहे.सुरीचे वकील हसन अहमद यांनी खानच्या सुटकेसाठी दाखल केलेल्या याचिकेत असा युक्तिवाद केला आहे की, सूरी याची पत्नी पॅलेस्टिनी वंशाची अमेरिकन नागरिक असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. वकिलाचे म्हणणे आहे की सरकारला असा संशय आहे की सुरी आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या इस्रायलबद्दलच्या भूमिकेच्या विरोधात आहेत, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या पॅलेस्टिनी संघटनेच्या हमासला प्रोत्साहन दिल्याचा आरोप सुरीवर आहे. याशिवाय, त्याच्यावर ज्ञात किंवा संशयित दहशतवाद्यांशी जवळचे संबंध असल्याचाही आरोप आहे.