PM Narendra Modi: बांगलादेशमध्ये (Bangladesh) जेव्हापासून शेख हसीना(Sheikh Hasina) यांचे सरकार कोसळून मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे तेव्हापासून भारत आणि बांगलादेशचे संबंध तणावाखाली आलेले आहेत. मोहम्मद युनूस हे पाकिस्तानशी जवळीक साधून भारताविरोधी भूमिका घेताना दिसत होते. आता मात्र बांगलादेश सरकारने भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मोहम्मद युनूस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी बांगलादेशने भारताशी संपर्क साधला आहे. बँकॉक येथे 2 ते 4 एप्रिल दरम्यान 6 वी बिम्सटेक( BIMSTEC) शिखर परिषदेत होणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे मोहम्मद युनूस हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बांगलादेशने दोन्ही नेत्यांमध्ये बॅंकाॅक येथे बैठक आयोजित करण्यासाठीभारताशी संपर्क साधला आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांनी म्हटले आहे की, बिमस्टेक परिषदेच्या वेळी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यासाठी आम्ही भारताशी राजनैतिक संपर्क साधला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस हे 28 मार्चला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये, बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन यांनी ओमान येथे झालेल्या हिंद महासागर परिषदेत भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर(S. Jaishankar) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर एस. जयशंकर यांनी म्हटले होते की, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली.