Punjab Farmer movement: जवळापास गेल्या तेरा महिन्यांपासून खनौरी आणि शंभू सीमेवर पंजाबमधील शेकडो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र बुधवारी (दि. १९ मार्च) रात्री अचानक शंभू आणि खनौरी या दोन्ही ठिकाणच्या आंदोलनस्थळी सुमारे 3000 पोलीस कर्मचारी आले आणि पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावले.
पंजाब पोलिसांनी बुधवारी रात्री अचानक आंदोलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तंबूवरती आणि शेतकऱ्यांच्या इतर साहित्यावरती बुलडोझर चालवला. यावेळी खनौरी आणि शंभू सीमेवर आंदोलनाला बसलेल्या जवळपास ७०० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच किसान मजदूर मोर्चाचे नेते सरवनसिंग पंढेर आणि संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजितसिंह डल्लेवाल हे एका बैठकीवरून आंदोलनस्थळी येत असताना आंदोनलस्थळी पोहचण्या आधीच त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
आंदोलन सुरू झाल्यापासून एक वर्षांनी केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांमध्ये बैठका सुरू झाल्या होत्या. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिली बैठक झाली होती. तर दुसरी बैठक २२ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. तर तिसरी बैठक १९ मार्च रोजी पार पडली आणि याच दिवशी पंजाब पोलिसांनी आंदोलन उधळून लावले. म्हणजेच केंद्र सरकारने आंदोलकांची दखल घेऊन आंदोलकांशी चर्चा सुरू केली होती. त्यातच अचानक शेतकरी आंदोलनावर कारवाई करणे हे पंजाबमधील आम आदमी सरकारची विचारपूर्वक रणनीती असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.
पोलिसांच्या कारवाईनंतर खनौरी सीमा आणि लगतच्या संगरूर आणि पटियाला जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच पंजाबमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. दरम्यान हमीभाव कायद्याच्या गॅरंटीसह विविध मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकरी फेब्रुवारी २०२४ पासून आंदोलनाला बसले होते.