Maharashtra Bhushan Award: राज्य सरकारकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार( Ram Sutar)यांना जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis)यांनी विधानसभेत आज पुरस्काराबाबत घोषणा केली.
शिल्पकार राम सुतार यांना २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे. गुजरातमधील प्रसिद्ध स्टॅच्यु ऑफ युनिटी अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांनी घडवला आहे. चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीची मूर्तीही राम सुतार हेच घडवत आहेत. कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण २०२२४ या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे राम सुतार यांचे वय शंभर असून वयाच्या १०० व्या वर्षीही ते शिल्प घडवत आहेत.
दरम्यान, राम सुतार मूळचे धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावातील आहेत. त्यांनी मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. राम सुतार यांनी १९६० मध्ये त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला होता, तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी अनेक शिल्पकला घडवल्या. त्यांच्या शिल्पकलेचे कौतुक करावे तेवढे कमीच म्हणावे लागेल.