T Raja Singh On Amol Mitkari: महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या थडग्यावरून वातावरण तापलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलीकडेच नागपूर येथे काही कट्टर पंथीयांनी दंगल घडवून आणली होती. त्याच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, नागपूर पोलिस परिस्थितीचा सक्रियपणे तपास करत आहेत, तसेच त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत सहा जणांवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे आणि अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. साहजिकच या घटनेमुळे राजकीय तणाव निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. कारण वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करत आहेत.
अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांच्यावर टीका केली आहे, छत्रपती संभाजी नगरमधील औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे असे टी राजा सिंह बोलत आहेत, असा प्रश्न जेंव्हा अमोल मिटकरी यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, टी. राजा यांचे वक्तव्य कोणीही गांभीर्याने घेत नाही, ते भडकाऊ भाषण देण्यात माहीर आहेत. अशी भडकाऊ वक्तव्य करून ते महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले, जर खरच त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आपल्या मुलाला घेवून यावे आणि औरंगजेबाच्या कबरीवर जावे.
यावर उत्तर देताना भाजप आमदार टी राजा यांनी अमोल मिटकरींचा चांगलाच खरपूस शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले की महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतून औरंगजेबाची कबर हटली पाहिजे, त्याप्रमाणे संपूर्ण भारतात एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा आमदार अमोल मिटकरी माझ्यावर टिप्पणी करतो कि राजा सिंह यांची पुढील पिढी परदेशात शिक्षण घेईल.
अमोल मिटकरी तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तुमच्या मुलासह हातात फावडा घेवून औरंगजेबाची कबर फोडण्यासाठी या. ते पुढे म्हणाले, औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करण्यासाठी मी आणि माझा मुलगादेखील येऊ . भारताचा प्रत्येक पुत्र यासाठी येईल. औरंगजेबाच्या बाजूने समर्थन करणारा जो समाज आहे, त्यातले अमोल मिटकरी तुम्ही आहात. मला असे वाटते कि तुम्ही औरंगजेबाच्या कुटुंबातील आहात, अशा कठोर शब्दात टी. राजा सिंह यांनी अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर दिले.