भारताच्या संरक्षण क्षमतांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने भारतीय सैन्यासाठी अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टम (ATAGS) खरेदीला हिरवा कंदील दाखवला आहे. ७,००० कोटी रुपयांचा हा करार तोफखाना उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ATAGS ही एक अत्याधुनिक १५५ मिमी तोफखाना प्रणाली आहे, जी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा भाग म्हणून पूर्णपणे भारतात विकसित केली गेली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि खाजगी भारतीय संरक्षण उत्पादकांच्या सहकार्याने विकसित केलेली ही अशा प्रकारची पहिली स्वदेशी तोफखाना प्रणाली आहे. ज्यामध्ये ५२-कॅलिबर लांब बॅरल आहे, जी ४० किमी पर्यंत प्रभावी फायरिंग रेंजपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे तसेच या प्रणालीमुळे उच्च मारकता प्राप्त होते आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक भार वाहून नेण्याची क्षमता मिळते. शिवाय, स्वयंचलित तैनाती, लक्ष्य भेदण्याची क्षमता आणि कमी क्रू यामुळे ही प्रणाली अधिक प्रभावी ठरते.
या प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीमचे देशांतर्गत ६५ टक्क्यांहून अधिक घटक हे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बॅरल, थूथन ब्रेक, ब्रीच मेकॅनिझम, रिकॉइल सिस्टम आणि दारूगोळा हाताळणी यासारख्या महत्त्वाच्या उपप्रणालींचा समावेश आहे. या विकासामुळे भारताचा संरक्षण उद्योग केवळ मजबूत होत नाही तर परदेशी आयातीवरील अवलंबित्व देखील कमी होते.
ATAGS च्या समावेशामुळे भारतीय सैन्याच्या तोफखाना क्षमतांमध्ये लक्षणीयरीत्या आधुनिकीकरण होईल, जुन्या १०५ मिमी आणि १३० मिमी तोफांची जागा घेतली जाईल. ही प्रणाली भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर तैनात केली जाईल, ज्यामुळे देशाची संरक्षण स्थिती आणखी मजबूत होईल. याव्यतिरिक्त, ATAGS च्या उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, जागतिक संरक्षण निर्यात बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत होईल आणि भविष्यात स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.