IPL:इंडियन प्रीमिअर लीगचे(IPL)भारतासह संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्यामुळे अनेकजण आयपीएल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. २२ मार्चपासून आयपीएलचा १८ वा सीजन सुरू होणार आहे, त्यामुळे क्रिक्रेटप्रेमी खुश आहेत. मात्र आयपीएल सुरू होण्यास अगदी काही तास उरले असतानाच आता आयपीएलच्या नियमांबाबत एक अपडेट समोर आली आहे.
बीसीसीआयने(BCCI)20 मार्च रोजी, चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावण्याच्या नियमावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सर्व 10 संघांच्या कर्णधारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर अखेर चेंडूला लाळ किंवा थुंकी लावण्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळात म्हणजेच गेल्या पाच वर्षांपासून यावरती बंदी होती. मात्र आता बीसीसीआयने ही बंदी उठवली आहे. त्यामुळे गोलंदाजांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
२२ मार्च रोजी आयपीएल सुरू होऊन २५ मे २०२५ रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात १० संघ आपापसात १३ ठिकाणी एकूण ७४ सामने खेळणार आहेत. सामने संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहेत. तर नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. डबल हेडर असलेल्या दिवसांत दुपारच्या सामन्यांचा वेळ दुपारी ३:३० वाजता असेल आणि नाणेफेक दुपारी ३ वाजता होईल.
विशेष म्हणजे, कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर उद्घाटन सामना होणार असून अंतिम सामना देखील याच ठिकाणी खेळला जाणार आहे. सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर क्रिकेटप्रेमींना पाहता येतील. तसेच सर्व सामने हिंदी, इंग्रजीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रसारित केले जाणार आहेत. जिओहॉटस्टारवर देखील आयपीएलचे सामाने पाहता येणार आहेत.