Prashant Koratkar: काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी नागपूरमधील पत्रकार प्रशांत कोरटकरने दिली होती. त्यानंतर राज्यातील वातावरण तापलेले पाहून कोरटकर फरार झाला आहे.
मात्र आता तो दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर प्रशांत कोरटकरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तो आखाती देशात उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या मागे अरेबिक भाषेतील बोर्ड दिसत आहे. तसेच आखाती देशाची नंबर प्लेट असलेली गाडीही उभी असल्याचे दिसत आहे. त्यावरून तो पोलिसांना चकवा देत दुबईला पळून गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र कोरटकरचा तो फोटो जुना आहे की आता आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी एक्सवरती पोस्ट करत म्हटले आहे की, कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूर वरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे.
मात्र कोरटकर दुबईला गेला आहे की नाही, यावरती पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु प्रशांत कोरटकर फरार असल्याने अनेकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्निचिन्ह उपस्थित केले आहेत.