Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने उष्णता शिगेला पोहचली आहे. त्यातच हवामान विभागाने( Meteorological Department) राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.तर विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.एकंदरीत पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा आणि गारपिटीची शक्यता असल्यामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
वाशिम, नागपूर, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यासह कोकणात पावसासोबतच तापमानात देखील वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज ( २२ मार्च) मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहील. तसेच मुंबईत उष्ण व दमट हवामान वाढणार असून उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने पूर्व मध्य भारत, उत्तर पूर्व भारत आणि अरुणाचल प्रदेशात उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 20 ते 23 मार्चदरम्यान या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.