नागपूर हिंसाचारात एका महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, नागपूर हिंसाचारात महिला पोलिसांचा विनयभंग झाल्याच्या आरोपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयभंग झाला नसल्याचा खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या खुलाशामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक करत जाळपोळ केली होती. ज्यात अनेक पोलिस जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच येथे दंगलखोरांनी एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आता त्या दंगलीत महिला पोलिसाचा विनयभंग झालाच नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करताना, महिला पोलिसांचा विनयभंग झाला नाही. तिच्यावर दगडफेक झाली. विनयभंगाच्या बातम्या चुकीच्या आहेत. विनयभंग झाला नसल्याची माहिती पोलिस आयुक्तांनीच आपल्याला दिली असल्याचे फडणवीसांनी म्हटलं आहे.
या दंगलीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सरकारला घेरलं जातयं. आताच दंगली कशा उसळतात, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी यावरून सरकारवर निशाणा साधलाय. सत्ताधारी वातावरण दुषित करताहेत. पोलीस सत्ताधा-यांच्या दबावात आहेत, असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे.
हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूर शहरात लावण्यात आलेली संचारबंदी सलग पाचव्या दिवशीही कायम आहे.. शहरातील 9 विभागातील संचारबंदी अद्यापही कायम असून दोन विभागातील संचारबंदी हटवण्यात आलीये.. गणेशपेठ, कोतवाली, तहसील, लकडगंज, पाचपावली,शांतीनगर,सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे.