CM Devendra Fadnvis: नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा (Nashik Kumbh Mela) होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis)यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याबाबत मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कायदा तयार करणार असल्याचे, फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस २३ मार्च रोजी नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. तसेच कुशावर्त तिर्थाची पाहणी देखील केली. तसेच त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे असे फडणवीस म्हणाले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकासासाठी एक आराखडा देखील तयार करण्यात आला असून कुंभमेळ्याच्या आधी त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही फडणवीसांनी नाशिक दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
साधू संतांनी मागणी केली आहे की, देवेंद्र फडणवीस यांनीच कुंभमेळ्याची जबाबदारी घ्यावी, याबाबत एका पत्रकराने विचारले असता फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहेच. पण, आपण आता उत्तर प्रदेशने ज्याप्रकारे कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि कुंभमेळा प्राधिकरण तयार केले. तसेच आपण देखील कायदा तयार करत आहोत. आपणही कुंभमेळा प्राधिकरण तयार करून त्याला कायदेशीर चौकट देत आहोत.
नाशिकचा कुंभमेळा हा सगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू. हा आस्थाचा महाकुंभ होईल, टेक्निकली महाकुंभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील प्रशासकीय टीम कुंभमेळ्यासाठी सक्षम आहे. नाशिक आणि महाराष्ट्राचे युवा वेगळ्या पद्धतीने कुंभमेळ्यात जोडले गेले पाहिजेत, असेही फडणीवस म्हणाले.