राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामरा प्रकरणावर आता प्रतिक्रिया दिली आहे. विनोदालाही एक मर्यादा असते. सध्या सुरु असलेलं प्रकरण हे सुपारी घेतल्यासारखं आहे. असं एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल आहे.
सोमवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं होत. यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक वादग्रस्त गाणं देखील म्हंटल. तसंच यावेळी त्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भाष्य केलं. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं.
या सगळ्या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित आहे. व्यंगही आहे. हे आम्हालाही कळतं. परंतु यालाही एक मर्यादा आहे. हे सगळं प्रकरण म्हणजे एखाद्याविरुद्ध बोलण्यासाठी सुपारी घेण्यासारखं आहे. कामराने सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, अर्थमंत्री आणि काही उद्योगपतींसंदर्भात देखील वादग्रस्त व्यंग केले आहे. कामरा जे करतोय ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. तर तो कुणासाठीतरी काम करत असल्यासारखे आहे.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काल तोडफोड करण्यात आली होती. त्यावर देखील एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. स्टु़डिओची जी तोडफोड झाली त्याचं मी समर्थन करत नाही. असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.